Mumbai – Indore Rail Connectivity : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने (The Cabinet Committee on Economic Affairs – CCEA) इंदूर आणि मनमाड दरम्यान नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित केले आहेत. यासाठी १८ हजार ३६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गामुळे कनेक्टिव्हिटी आणि गतिशीलता सुधारेल असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या भारताच्या व्हिजनच्या अनुषंगाने असून या प्रकल्पामुळे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील असा दावाही करण्यात आला आहे. तसंच, मुंबई आणि इंदूरसारख्या व्यावसायिक शहरांना या रेल्वे प्रकल्पाचा फायदा होणार असल्याचंही सरकारने म्हटलं आहे.
केव्हा पूर्ण होणार प्रकल्प?
पंतप्रधान गती शक्ती नॅशनल मास्टर प्लान अंतर्गत हा प्रकल्प मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटीसाठी उभारण्यात आला आहे. प्रवासी, वस्तू आणि सेवांच्या वाहतुकीसाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पामध्ये दोन राज्यातील सहा जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्रातील दोन आणि मध्य प्रदेश चार जिल्हे या मार्गामुळे जोडले जाणार आहे. तसंच, या मार्गामुळे भारतीय रेल्वेचे सध्याचे नेटवर्क ३०९ किमीने वाढणार आहे. २०२८-२०२९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
Leave a Reply